Ad will apear here
Next
‘पुलं’ म्हणजे मराठीतले टागोर’

‘रवींद्रनाथांनी बंगाली साहित्यात जसा सर्वत्र संचार केला, तसा मराठीत ‘पुलं’नी केला आहे. मराठीत ते जवळजवळ गुरुदेवांच्या पदावर पोहचले आहेत, असं ‘गदिमां’नी म्हटलं आहे. ‘पुलं’च्या कामगिरीचा याहून वेगळा काही सारांश सांगता येत नाही,’ अशी भावना पु. ल. देशपांडे यांचे द्विखंडीय समग्र चरित्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त त्यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केलेल्या या भावना...

........

ऐंशी वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या ‘पुलं’नी पहिल्या महायुद्धाचे परिणाम, दुसरं महायुद्ध, भारताचं स्वातंत्र्य, नंतर झालेली प्रगती अशी अनेक सामाजिक स्थित्यंतरं पाहिली. एका आयुष्यात त्यांना बहुविध प्रकारचे अनुभव घेता आले. त्या सर्व अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिलं आणि त्या सगळ्या अनुभवांचं सोनं केलं. त्यांनी विविध साहित्यप्रकारांतून हा जीवनानुभव पुढे आणला.

आपण ‘पुलं’ आणि विनोद अशी सांगड सहज घालत असलो, तरी त्यांनी विविध वाङ्मयप्रकार हाताळले. दीर्घकालीन बैठकीची कादंबरी सोडली, तरी त्यांनी बालसाहित्य, अनुवाद, व्यक्तिचित्रण, नाटक, प्रवासवर्णन असे सर्व प्रकार लिहिले आहेत. कथा त्यांनी फारशा लिहिल्या नसल्या, तरी त्यांची व्यक्तिचित्रणं कथेच्या सीमारेषेवर जाणारी आहेत. आता विचार केला, तर कौतुक आणि आश्चर्य वाटतं, की त्यांनी एकेका साहित्यप्रकारात जे उत्तुंग शिखर गाठलं आहे, ते आजही लेखकांना पार करता आलेलं नाही. उदाहरणार्थ, ‘तुज आहे तुझपाशी’ हे सामाजिक नाटक त्यांनी १९५६च्या अखेरीस लिहिलं आहे. आज मराठीमध्ये सामाजिक नाटकांचा इतिहास लिहायचा म्हटला, तर ‘तुज आहे तुझपाशी’चा उल्लेख केल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. प्रवासवर्णनातही त्यांनी ‘अपूर्वाई’ १९६१मध्ये लिहिलं. पहिल्याच प्रवासवर्णनात त्यांनी उत्तुंग झेप घेतली. आजही अपूर्वाई, पूर्वरंग यांच्या तोडीस तोड प्रवासवर्णन आढळत नाही. व्यक्तिचित्रणात नंदा प्रधान, सखाराम गटणे आदी काल्पनिक व्यक्ती त्यांनी आपल्या लिखाणातून जिवंत केल्या. आपल्याला या व्यक्ती वास्तवात आहेत असं वाटतं. दुसरीकडे हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, बेगम अख्तर अशा वास्तवातील व्यक्तींची चित्रणं त्यांनी कल्पनारम्य वाटावीत अशा पातळीवर लिहिली आहेत. आज मराठीत नंदा प्रधानसारखं व्यक्तिचित्रण दिसत नाही.

‘पुलं’नी २५ ते २६ सिनेमांना संगीतही दिलं आहे. संगीतकार श्रीनिवास खळे एकदा म्हणाले होते, ‘मराठीत माझं ‘गोरी गोरी पान’ हे पहिलं बालगीत खूप लोकप्रिय असलं, तरी खरं बालगीत ‘पुलं’नी ‘दूधभात’ चित्रपटात संगीत दिलेलं ‘नाच रे मोरा’ हेच आहे.’

अनुवादात पाहिलं, तर ‘पुलं’नी ‘ पिग्मॅलियन’चा भावानुवाद केलेलं ‘ती फुलराणी’ हे नाटक इतकं दर्जेदार आहे, की ते अनुवादित वाटतच नाही. ते आपल्या मातीतलं वाटतं. अशा प्रकारे अनुवाद, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन अशा सर्वच प्रकारांत त्यांनी एकेक अशी उत्तुंग शिखरं निर्माण केली आहेत, ती आजही कोणालाही गाठता आलेली नाहीत. हे त्यांनी मराठी साहित्याला दिलेलं फार मोठं योगदान आहे.

‘पुलं’बद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्यातला एक किस्सा मला फार महत्त्वाचा वाटतो. एकदा दिल्लीत एका भोजनाच्या कार्यक्रमाला ‘पुलं’सह ग. दि. माडगूळकर, यशवंतराव चव्हाण अशी मंडळी एकत्र होती. त्या वेळी कुणीतरी ‘गदिमां’ना विचारलं, की तुम्ही शीघ्रकवी आहात. व्यक्तींविषयी छोट्या कविता करता, तर ‘पुलं’विषयी काय लिहाल? ‘गदिमां’नी दहा मिनिटांत चार ओळी लिहिल्या.

त्या अशा...

पाया पडती राजकारणी करणी ऐसी थोर ।

मराठीस तू बिनदाढीचा रवींद्र टागोर।।

यात ‘गदिमां’नी ‘पुलं’ची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी केली आहे. रवींद्रनाथांनी बंगाली साहित्यात जसा सर्वत्र संचार केला, तसा मराठीत ‘पुलं’नी केला आहे. मराठीत ते जवळजवळ गुरुदेवांच्या पदावर पोहचले आहेत, असं ‘गदिमां’नी म्हटलं आहे. ‘पुलं’च्या कामगिरीचा याहून वेगळा काही सारांश सांगता येत नाही.

(व्हिडिओ, शब्दांकन : प्राची गावस्कर)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZXVCG
Similar Posts
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे
‘पुलं’विषयी वेगळी आपुलकी’ ‘मी वाचतो भरपूर; पण सर्व लेखकांच्या तुलनेत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे....’ हे विचार आहेत आजच्या पिढीतला अभ्यासू अभिनेता आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकात साक्षात ‘पुलं’चीच भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलेला रंगकर्मी आनंद इंगळे याचे. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त आनंदनं त्यांच्याबद्दलच्या भावना ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language